रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपचे नारायण राणे आणि शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते.
भाजपतर्फे गुरुवारी राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काम प्रामाणिकपणे व पूर्ण ताकदीने करू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग- रत्नागिरीची जागा महायुतीमध्ये कोणाला जागा मिळणार यावरून वाद होता. शिवसेना व भाजप हे दोन्हीही पक्ष या जागेवरून अडून बसले होते.
मात्र तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. राणे यांचे काम प्रामाणिकपणे व ताकदीने काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
अर्ज दाखल करण्यासाठी २४ तास उरले असल्याने संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘उमेदवारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती. चार दिवसांपूर्वी फडणवीस यांची भेट घेऊन कोकणची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली होती.
शिंदे, फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर किरण सामंत यांनी तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे ज्येष्ठ नेते असून ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तरी आपण शिवसेना म्हणून पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणाने काम करू असे ठरविले आहे.’’