खेडच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट नगराध्यक्ष वैभव खेडेकर आहेत. ते उद्धव ठाकरे व अनिल परब यांच्या इशाऱ्यावर काम करतात ते मनसैनिक कसे, असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. खेड येथे आज (दि.१९) पत्रकार परिषदेत त्यांनी खेडेकर यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर खेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीच्या नेत्यावर आरोप केले होते. या आरोपांना आज शिवसेना नेते रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधात काम केले. मनसेची कोणतीही युती राष्ट्रवादी सोबत नसताना राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्यासोबत त्यांनी काम केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही युती नसताना त्यांनी अनिल परब सोबत पालिकेच्या निवडणुकीत माझ्या मुलाच्या विरोधात काम केले.
केवळ राज ठाकरेंची सहानभुती मिळवण्यासाठी स्वतःला मनसैनिक म्हणवून घ्यायचे आणि आपले भ्रष्ट धंदे करायचे. खेडच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष असा लौकिक त्यांनी मिळवला आहे.