CM एकनाथ शिंदे : देवेंद्र फडणविसांसह ‘या’ चार नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा होता मविआ प्लान…

Photo of author

By Sandhya

CM एकनाथ शिंदें

लोकसभा निवडणूकीदरम्यान राज्यभरात दिग्गज नेत्यांच्या सभा सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने केलाअसल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. तसेच भाजपच्या आमदारांना फोडण्याचा देखील त्यांचा प्लान असल्याचे शिंदे म्हणालेत. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ? एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कटकारस्थान मविआ सरकारने आखलं होतं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनीही केला होता.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता.

एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता,” असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी कायमच डावलले पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “मविआ सरकारमध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मला कायमच डावलले आहे.

माझ्या नगरविकास खाते असताना मला कधीच स्वतंत्रपणे काम करु दिले नाही. कायम ठाकरे कुटुंबाकडून हस्तक्षेप होत होता. मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते.”

“नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता.

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्वनियोजित कट होता. बाळासाहेबांप्रमाणे ‘किंगमेकर’ होण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना स्वतः ‘किंग’ व्हायचे होते,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले. जागावाटपाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्त्वपूर्ण विधान

या मुलाखतीदरम्यान जागावाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतील याबाबतही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना १६ जागा लढणार आहे. त्यात मुंबईमधील तीन जागांचा समावेश असेल.

तसेच जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसून आम्ही ४२ जागा जिंकून २०१९ चा विक्रम मोडीत काढू, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

तर विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकिट नाकारण्यात आले याविषयी बोलताना उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब होती. भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास सांगण्याचा प्रश्नच येत नाही असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

Leave a Comment