‘‘देशातील जनतेवर इंग्रजांनी जेवढा अन्याय केला नाही, त्याहून अधिक अन्याय भाजपने केला आहे. देशातील ७० कोटी जनतेकडे जितका पैसा आहे, तेवढा पैसा पंतप्रधान मोदींच्या जवळील मोजक्याच अब्जाधीश मित्रांकडे आहे.
त्यांनी दहा वर्षांत शेतकरी, युवक, कामगार, गरिबांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गरिबांचे कैवारी नव्हे तर अवघ्या २२ ते २५ अब्जाधीशांचे सरदार आहेत,’’अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सोलापुरात केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेनिमित्त राहुल गांधी यांची आज (बुधवारी) सोलापुरात सभा पार पडली.
यावेळी प्रणिती शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘मनरेगा’अंतर्गत २४ वर्षे कामे सुरू राहिल्यानंतर जेवढा पैसा गरिबांना मिळाला असता किंवा देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना २४ वेळा कर्जमाफी देता आली असती, तेवढा पैसा (१६ लाख कोटी रुपये) नरेंद्र मोदींनी केवळ २२ ते २५ अब्जाधीशांना माफ केला. पण, गरिबांना काहीच दिले नाही.
देशातील ७० कोटी लोकांकडे जेवढा पैसा आहे, तेवढा पैसा २२ ते २५ अब्जाधीशांकडे आहे. देशातील केवळ एक टक्के लोकांकडे ४० टक्के पैसा आहे. नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येईल म्हणाले, पण जीएसटी लादून मोदींनी मोजक्यांनाच अब्जाधीश बनवले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले, पण त्यांचा शेतमाल बाजारात आला की भाव पडतो. दुसरीकडे टूथपेस्ट, चिप्स, ज्यूस विकणाऱ्याचा मोठा फायदा होतो.
भुकेने मरणारा गरीब, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यावर माध्यमे काहीच बोलत नाही. माध्यमांचे मालक व देशातील बड्या २०० कंपन्यांचे मालक मराठा, धनगर, दलित, आदिवासी कोणीच नाहीत.’’ निवडणूक रोखे प्रकरण नरेंद्र मोदींना निवडणुकीनंतर निश्चितपणे महागात पडेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला.