![पंतप्रधान नरेंद्र मोदी](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-2024-04-29T155215.868.png)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरात होते. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोदींची पार्क मैदानावर सभा झाली.
या सभेच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. ते म्हणाले, सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी व ग्रामदैवत सिद्धेश्वरांना नमस्कार करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या समुदायांच्या आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देणार. या समुदायांचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे.
ते पुढे म्हणाले दलित आदिवासांची मुलांनी देशाचे नेतृत्त्व करावे असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून बाबू जगजीवन राम याच्यापर्यंत सर्व दलित नेत्यांचा अपमान केला.
भाजपचा कायमच प्रयत्न राहिला आहे की, एसटी, एससी आणि ओबीसींना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सत्ता दिले तेव्हा भाजपने एका दलिताच्या मुलाला राष्ट्रपती केले. 2019 मध्ये जेव्हा पुन्हा सत्ता दिली तेव्हा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एका आदीवासीचंया मुलीला राष्ट्रपती केले, असे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेला उमेदवार राम सातपुते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी आमदारांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली.
पुढे फडणवीस यांनी आमदार राम सातपुत या उसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान सोलापूर लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल लागणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात आज प्रचाराचा धडाका आहे. ते सोलापुरातील सभेनंतर साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठीही प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे ते आज विरोधकांवर काय काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.