राज्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढत असल्याचे दिसत आहे. कालपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील उमेदवारांसाठी प्रचार सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यातच आज रणजितसिंग निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरसमध्ये मोदींची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते-पाटील घराण्यावर सडकून टीका केली.
सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी,”मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे म्हटले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंडभरुन प्रशंसा केली. तसेच भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते-पाटील घराण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला.
या तालुक्याला ‘त्यांच्या’ दहशतीपासून मुक्त करणार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात माढ्यात उभ्या असणाऱ्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे. त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, कित्येक जणांवर हल्ले झाले.
मात्र, आता हे हल्ले सहन केले जाणार नाहीत. ही लोकशाही आहे. त्यामुळे इकडे ही ठोकशाही चालून देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते-पाटील घराण्याला ठणकावून सांगितले.
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवर फडणवीसांची टीका माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला. याठिकाणी पाणी आले, रेल्वे आली. आता येथील 36 गावांच्या पाण्याचा जो प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडवण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. यापूर्वी माढ्यात कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला.
या भागातील लोकांना वारंवार पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची फाईल उघडली तेव्हा पाणी उपलब्ध नाही, असा शेरा मारुन ती बंद करण्यात आली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला जागतिक बँकेने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी पैसे देण्याचे जागतिक बँकेने मान्य केले आहे.
त्यामुळे आता कृष्णा नदीत वाहून जाणारं पुराचं पाणी आपल्याला उजनीत आणता येईल. मोदींसारखा नेता पाठिशी असेल तरच हे शक्य आहे. या भागात महामार्ग, पाण्याच्या योजना हे सर्वकाही मोदींमुळे शक्य झाले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.