मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ‘श्रीकांत शिंदेंनी पाच वर्षात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली’

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते,

पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा सामना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी होणार आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात कडक्याच्या उन्हात देखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते.

कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील दहा वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या रॅलीतून दिसली. पुढची पाच वर्ष कल्याण डोंबिवलीसाठी निधी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. पण निवडून आल्यानंतर विकास कामातून त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे सगळ्यांनी 20 तारखेपर्यंत मेहनत करा, पुढची पाच वर्ष खासदार तुमची सेवा करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण , पालघर, भिवंडी, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Leave a Comment