
देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगामध्ये टाकून भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे पूर्ण प्लानिंग उद्धव ठाकरे यांनी केले होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. त्यांचे प्लानिंग यशस्वी झाले असते, तर मला माझी खेळी खेळता आली नसती. त्यामुळे ठाकरेंचा प्लान अंमलात येण्यापूर्वी मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भाजपच्या लोकांना आत घालून मलाही संपविण्याचे कटकारस्थान सुरू होते. एका गुन्ह्यात माझे खोटे नाव गोवण्याचे काम सुरू होते. उद्धव यांना धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार नको असून, त्यांना केवळ पैसाच हवा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मी हरिश्चंद्र असलो, तरी मी एकदा ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो. खरी शिवसेना आमचीच आहे, त्यांच्याकडे ना नेता, ना झेंडा, ना अजेंडा आहे; आमच्याकडे विकासाचा अंजेडा असल्याचे त्यांनी सांगितले. मी जिथे बसतो तिथे त्यांचा बाजार उठवून टाकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यातील महायुतीच्या बैठकीला माजी मंत्री गणेश नाईक व त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक गैरहजर होते. भाजपच्या आ. मंदा म्हात्रे या हजर होत्या. संजीव नाईक हे भाजपच्या वतीने ठाण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
दिघेंची लोकप्रियता ठाकरेंना सलत होती शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची वाढती प्रसिद्धी उद्धव ठाकरे यांच्या नजरेत खुपत होती. त्यामुळे दिघे यांचे जिल्हाप्रमुख काढण्याचे कारस्थान आखण्यात आले होते, त्यांच्या जागी पर्यायी व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार होती, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
‘धर्मवीर’ चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या; परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार, असेही ते म्हणाले. शिंदे म्हणाले की, दिघेंना ‘मातोश्री’ने मानसिक त्रास दिला.
दिघे इस्पितळात असताना त्यांना पद सोडण्याचा निरोप दिल्याने ते बेचैन झाले होते; परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही, असे अनेकांनी ‘मातोश्री’ला सांगितले. त्यानंतर ‘मातोश्री’ने निर्णय मागे घेतला.
दिघे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून राज ठाकरे यांचे नाव पुढे केले होते; परंतु त्याची दखल घेतली नाही, असेही शिंदे म्हणाले.