मनोज जरांगे पाटील : “६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर…”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झालेल्या मोठ्या आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी नेतृत्व केले. यानंतर आताही राज्यातील अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील दौरे करत असून, मराठा समाजाची संवाद साधत आहेत, अनेक सभांना संबोधित करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, अशी मागणी करताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

मराठा समाज शांत आहे. मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे नेते आम्हाला सांगतात की जातीयवाद करु नका. पण जातीयवाद न करण्याची जबाबदारी एकट्या मराठा समाजाची नाही.

जर सरकारने ऐकले नाही तर मराठा समाजाला सत्तेत घुसावे लागेल. सत्ता काबीज करावी लागेल मग सगळ्या गोष्टी आपोआप होतील. काही नेत्यांना जातीयवाद दूर करायचाच नाही, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर… ४ जूनला आम्ही उपोषण करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे उपोषण करणार आहोत. ४ जूनला आंतरवली सराटीतून आम्ही उपोषण सुरु करणार आहोत. ४ जूनची तारीख आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही.

मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करायची, केसेस मागे घ्यायच्या ठरल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, शिंदे समितीचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायचा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. नवीन मागणी कुठलीही नाही.

६ जूनपर्यंत सरकारने आरक्षण द्यावे ते झाले नाही तर आंदोलन बंद करणार नाही. कठोर आमरण उपोषण होणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, आम्हाला कोण पडले, कोण निवडून आले याचा आम्हाला आनंद नाही.

आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला बाकी कशात आनंद नाही. जे कुणी मुद्दाम डिवचत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जातीय तेढ नेत्यांना निर्माण करायची आहे मराठा समाजाला नाही. नेते जातीवाद करायचा म्हणतात, कॅमेरासमोर गोड बोलतात. पण प्रत्यक्षात कृती काहीही होत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page