मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य…

Photo of author

By Sandhya

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘‘माणसे आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. मागणी केल्यास संबंधित गावांत तीन दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सोय केली जाईल.

त्याशिवाय पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध आहे, गरजेनुसार आणखी चारा उपलब्ध करून दिला जाईल,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे उपलब्ध असून, बोगस बियाणांबाबत तक्रार आल्यास दोषींना थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मराठवाड्यातील टंचाई स्थिती व दुष्काळाचा आढावा घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना शिंदे म्हणाले, ‘‘मराठवाड्यात सध्या १२४९ गावे व ५१२ वाड्यांत १८३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडल्यास आणखी टॅंकर वाढविले जातील.

पाण्याच्या टंचाईबाबत प्रशासनाला कळविल्यास तीन दिवसांत टँकरची सोय करण्याची व्यवस्था केली आहे. शुद्ध आणि दर्जा तपासलेले पाणी जनतेला मिळावे, सोबतच जनावरांनाही पिण्याचे पाणी पुरविले जावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मदतीसाठी पाठपुरावा सुरू शिंदे म्हणाले,‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्याला वॉटर ग्रीड दिले. त्यानंतरच्या सरकारने ते रद्द केले. आता पुन्हा नव्याने आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करून वॉटर ग्रीड सुरू करत आहोत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासह प्रत्येक प्रश्न आम्ही संवेदनशीलतेने हाताळतो आहोत. नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.

विमा परतावाचा प्रश्न असो किंवा मदतीचा प्रश्न असो; त्यातील अडचणी तत्परतेने सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. विमा परताव्यात हलगर्जी करणाऱ्यांची गये केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’

Leave a Comment