नाना पटोले : “राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर; पाण्याच्या टँकरमध्येही भ्रष्टाचार”

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे.

राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक विभागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल.

३१ मे पासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते, महायुती सरकारवर प्रहार करत नाना पटोले पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे.

सरकारी अनास्थेमुळे टँकर माफियांचा सुळसुळाट सुरु आहे. पाण्याच्या टँकरला जीपीएस लावल्याचे सरकार सांगत आहे पण तो जीपीएस काढून मोटारसायकलला लावला जातो. सरकार पाण्याच्या टँकर माफियांकडूनही पैसे वसूल करते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारला आचार संहितेचा अडसर येतो पण टेंडरसाठी आचारसंहिता आडवी येत नाही. आपत्तीमध्ये निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मदत देता येते.

उद्या संध्याकाळी छत्रपती संभाजी नगरला जाऊन ३१ तारखेपासून दुष्काळ पाहणी दौरा केला जाईल व आयुक्तांना भेटून माहिती दिली जाईल आणि ४ जूननंतर पुन्हा दुष्काळी पाहणी दौरा केला जाणार आहे.

मराठवाडा विभागात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावती भागात माजी मंत्री यशोमती ठाकूर तर कोकण विभागात प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ शेतात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे.

Leave a Comment