
सोलापूर – लाखो रुपये खर्चून महिनाभरापूर्वीच वडिलांना घरी आणलेलं, अंथरुणाला खिळलेले, घरची परिस्थिती बेताची म्हणून मुलाला आश्रम शाळेत घातले. मंगळवारचा दिवस जणू घातवार म्हणून उगवला आणि अनुराग या कोवळ्या शाळकरी बालकाच्या बसवेश्वर तांड्याजवळ कोळी वस्तीशेजारी धावत्या स्कूल बसमधून पडून चाक अंगावर गेले. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला.
डोक्याची कवटी फुटून मेंदू अस्ताव्यस्त अन् रक्ताच्या चिळकांड्यानं रस्ता माखल्याचं हृदयद्रावक दृश्य मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास पाहायला मिळालं. सकाळी स्कूल बसने गेला आणि सायंकाळी शववाहिकेतून प्रेत बघण्याची वेळ राठोड कुटुंबियांवर आली. अनुराग राठोड असं १३ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालक दिलीप माळकर आणि क्लिनर अनिल पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बसवेश्वर तांड्यावर तिप्पण्णा राठोड हे कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येते.
महिनाभरापूर्वीच अनुरागचे वडील आजारी असल्याने दवाखान्यात उपचार घेत होते. घरी अनुरागचे आई वडील, आजी, भाऊ, दिव्यांग बहीण असं कुटुंब आहे. बेताची परिस्थिती असतानाही गुजराण करत होते. मुलगा शिकावा म्हणून त्याला कवठे येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेत टाकले. दररोज शाळेची स्कूल बस ने-आण करायची. नेहमीप्रमाणे अनुराग मंगळवारी सकाळी शाळेत स्कूल बसमधून गेला. जणू आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस असल्याचा मागमूसही त्याला नसावा. तो कोळीवस्तीजवळ अचानक बसच्या उघड्या दरवाजातून खाली पडला आणि त्याच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन जीव गेला.
चालक-क्लिनर चौकशीसाठी ताब्यात
अचानक घडलेल्या या प्रकाराची नातलगांना खबर मिळताच तांड्यावरील अनुरागच्या नातलगांचा शोक अनावर झाला. धाय मोकलून हंबरडा फोडला. झाल्या प्रकाराबद्दल संशय व्यक्त करून संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. पोलिसांनी घटनेच्या ४ तासानंतर चालक दिलीप माळकर, क्लिनर अनिल पवार यांना ताब्यात घेतले त्यानंतर अनुरागचा मृतदेह कुटुंबाने ताब्यात घेतला.
दरम्यान, संबंधित स्कूल बसबद्दल आरटीओ प्रशासनाकडे झालेल्या चौकशीत सदर बस कागदपत्रे जून-जुलै २०२५ पर्यंत अपडेट असून चालकाकडेही लायसन्स असल्याचं सांगण्यात आले. पोलीस तपासात बसमधील सुविधांबद्दलही अधिक माहिती तपासात पुढे येईल असं सांगण्यात येत आहे.