
पुणे : महान्यूज लाईव्ह
घटना आहे, पुणे शहरातील धनकवडी येथील. धनकवडीच्या अहिल्यादेवी चौकात एका चहाच्या स्टॉलवर सिलेंडरचा स्फोट झाला आणि कामावर आलेला व पहिला दिवस असलेल्या कामगाराचा या स्फोटात होरपळून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी संध्याकाळी चारच्या सुमाराची घटना घडली. अहिल्यादेवी चौकातील एका पानाच्या टपरीवर संतोष हेगडे नावाचा वीस वर्षाचा युवक चहा बनवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी या टपरीच्या समोर काही ग्राहक चहा पीत होते. सिलेंडरचा स्फोट झाला आणि इतर कामगार व ग्राहक पळाले, मात्र संतोषला बाहेर पडता आले नाही. आग भडकली आणि त्यात संतोष होरपळला.
संतोषला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आले आणि त्यांनी तीन सिलेंडर मधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत असताना आग आटोक्यात आणली. या घटनेचा पुढील तपास धनकवडीचे पोलीस करत आहेत.