मोबाईलवर बोलताना तरुणीला डंपरची धडक;  जागीच मृत्यू…

Photo of author

By Sandhya

डंपर

भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना कर्वे रस्त्यावर परिसरात बुधवारी सकाळी घडली. तरुणी मोबाईलवर बोलत दुभाजक ओलांडत होती, त्या वेळी भरधाव डंपरने तिला धडक दिली.

आरती सुरेश मनवाने (वय 23, रा. एरंडे हॉस्टेल, भेलकेनगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आरती मूळची अमरावतीची आहे. ती शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. अपघाताची माहिती तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. तिचे कुटुंबीय पुण्याकडे रवाना झाले आहे.

अपघातानंतर डंपरचालक पसार झाला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सकीम अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे यांनी दिली.

आरती बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. कर्वे रस्त्यावरील दामोदर व्हिला सोसायटीकडून ती कोथरूडमधील बसस्थानककडे जात होती. ती दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत होती. त्या वेळी ती मोबाईलवर बोलत होती. समोरून भरधाव वेगाने आलेला डंपर तिच्या नजरेस पडला नाही.

डंपरच्या चाकाखाली ती चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालकांनी डंपरचा पाठलाग करून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालक तेथून पसार झाला. यानंतर पोलिसांनी त्याला शोधून अटक केली.

अपघाताची माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे आणि पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. परंतु, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment