आम आदमी पक्षही राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!

Photo of author

By Sandhya

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीला महाराष्ट्रात भरघोस मतदान मिळालं. या योजनेचा सरकारला चांगला फायदा अन् विधानसभेत एकहाती सत्ता स्थापन करण्यास यश आलं. आता हीच योजना दिल्लीत आम आदमी पक्ष राबवणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मार्च २०२४ मध्ये महिलांना प्रतिमहा १००० रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु, आता त्यांनी ही रक्कम वाढवली असून २१०० रुपये केले आहे. यासंदर्भात आजच त्यांनी माहिती दिली.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केलं की दिल्ली मंत्रिमंडळाने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. जर आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला तर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. या योजनेसाठी नावनोंदणीही उद्यापासून सुरू होणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

“मी आधी प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही महिला माझ्याकडे आल्या आणि महागाईमुळे एक हजार रुपये पुरेसे नाहीत, असं सांगितलं. त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा केले जातील. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आज सकाळी अतिशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ही योजना मंजूर करण्यात आली”, असं केजरीवाल म्हणाले.

“महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात आणि त्यांच्या कामात त्यांना साथ देणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. दिल्लीच्या दोन कोटी लोकसंख्येसह आम्ही सर्वात मोठे अडथळे पार केले. शहरातील लोकांसाठी चांगले काम करण्यापासून कोणताही अडथळा आम्हाला रोखू शकत नाही”, असंही ते म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page