अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट ; ‘विद्यमान खासदारांना डावलून भाजपा शासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीत उतरविणार’…

Photo of author

By Sandhya

अंबादास दानवे

भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना बाजूला करू पाहत असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. “विद्यमान खासदारांच्या जागी सरकारी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे.

जुना जाणत्या नेत्यांना तिकीट नाकारून शासकीय अधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल, अशाप्रकारची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपा राष्ट्राच्या नावावर निवडणूक लढवू इच्छित आहे, असे दिसून येत आहे.

याच्यातून स्थानिक नेत्यांशी त्यांना काहीही देणंघेणं नाही”, अशीही टीका दानवे यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत असताना अंबादास दानवे यांनी ही टीका केली.

यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाबाबत पानभर जाहिराती छापून आल्याबद्दलचा प्रश्नही दानवे यांना विचारण्यात आला. यावर दानवे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण विरोधी आहेत, अशी भूमिका मराठा आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? हे सांगण्यासाठी वर्तमानपत्रात जाहीरात देण्यापेक्षा भाजपाच्या नेत्यांनी गावात जाऊन सांगावे. म्हणजे तुमच्यात ताकद आहे का? हे दिसेल, हे माझे तुम्हाला आव्हान आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर मराठवाड्यातील काही दैनिकांमध्ये या जाहिराती छापून आल्या आहेत. फडणवीस यांचे कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांनी ही जाहीरात प्रसिद्ध केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, असे अमित शाह म्हणाले.

यावर अंबादास दानवे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा काय करतो? त्याला बीसीसीआयचा सेक्रेटरी कशापद्धतीने बनविले, तो गुजरातच्या राजकारणात काय करतो? याचे उत्तर आधी अमित शाह यांनी द्यावे, मग त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलावे.

Leave a Comment

You cannot copy content of this page