आषाढी यात्रा व्हीआयपी दर्शन बंद

Photo of author

By Sandhya

आषाढी यात्रा काळासाठी व्हीआयपी दर्शन बंद

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत आषाढी वारी एकादशी सोहळा दि. २९ रोजी साजरा होत आहे. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे दर्शनाची रांग पाच कि.मी. गोपाळपूरच्या पुढे जाते.

भाविकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. भाविकांना दर्शन जलद व सुलभ व्हावे म्हणून यात्रा कालावधीत तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदेश दिले आहेत.

आषाढी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर यात्रा काळातील पुढील तीन दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच मानाच्या पालख्यांना मोजके दर्शन पास देण्यात येणार आहेत. व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या निर्णयामुळे दर्शन रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहणाऱ्या भाविक, वारकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच पालखीमार्ग व पंढरपूर येथील दर्शनरांग, पत्राशेड, चंद्रभागा नदी, ६५ एकर तळ, विठ्ठल मंदिर परिसराची पाहणी केली.

या दरम्यान मंदिर परिसरातील भाविकांशी विखे- पाटील यांनी चर्चा केली. तेव्हा श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन जलद मिळावे अशी व्यवस्था करा, व्हीआयपी लोकांमुळे दर्शन रांग जागेवरच थांबली जाते, अशा तक्रारी केल्या. याची दखल घेऊन पालकमंत्री विखे-पाटील यांनी आषाढी यात्रा काळासाठी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment