आदित्य ठाकरे : भाजपचे धोरण ‘जॉइन ऑर जेल’, शिंदेंना जेलमध्ये टाकणार होते…

Photo of author

By Sandhya

आदित्य ठाकरे

‘ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात,’ अशी भाजपची वृत्ती झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन भाजपने शिंदेंना गाठले. शिंदेंना जेलमध्ये टाकायचे होते.

त्यामुळे शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. पण त्यांनीही घात केला. भाजपने ‘जॉइन ऑर जेल’चे धोरण अवलंबले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार व भाजपवर केली.

उद्धव ठाकरे, शरद पवार स्वतःसाठी लढत नसून, केवळ माझा महाराष्ट्र, माझा देश आणि या देशाच्या संविधानासाठी काम करत आहेत. जो या महाराष्ट्राचा अपमान करेल, त्याला हा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘शेतकरीविरोधी असलेल्या भाजपला मतदान करू नका. या सरकारने राज्यातील उद्योग गुजरातला पाठविले. नवीन उद्योग महाराष्ट्रात आणले नाहीत. भ्रष्टाचारी लोकांना सरकारमध्ये मंत्रिपदे दिली.

काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यात पैसे, दुपटीचे उत्पन्न, प्रधानमंत्री आवास योजना यासारखी आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाहीत. राहुल नार्वेकरांनी पक्षांबाबतचा दिलेला निकाल म्हणजे संविधानाला लागलेली पहिली ठेच आहे.

हे सरकार सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल. येत्या चार जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून, अब की बार भाजपा तडीपार, अशी अवस्था होणार आहे.’’

या वेळी आमदार संग्राम थोपटे, रोहित पवार, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी खासदार विदुरा (नाना) नवले, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, सचिन आहिर, तुषार कामठे, शंकर मांडेकर, संतोष मोहोळ आदी उपस्थित होते.

या वेळी नवले म्हणाले, ‘मुळशीचा विकास शरद पवार यांनी केला असून, उपकारकर्त्याला विसरले जाते, ही खेदाची बाब आहे.’ या वेळी रोहित पवार, लोंढे, गायकवाड, गंगाराम मातेरे यांचीही भाषणे झाली.

Leave a Comment