शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आज संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पैठण आणि वैजापूर येथे त्यांचे शेतकरी संवाद मेळावे आहेत. पैठण येथील सभेसाठी पोहोचले, तिथेही मराठा आंदोलकांनी त्यांच्या भाषणा दरम्यान घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या होमग्राऊंडवर त्यांच्यावर टोलेबाजी केली.
किती लोक खोके, धोके, वाईनची दुकानं घेत फिरत आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी खासदार भुमरेंवर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा जागा जिंकण्याचा निश्चय शिवसेना ठाकरे गटाने शिव संकल्प मेळाव्यातून केला.
त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज जिल्हा दौऱ्यावर आले. पैठण येथे आयोजित सभेत त्यांनी खासदार भुमरेंसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी गद्दारी झाली. तेव्हा निष्ठा यात्रा काढण्यात आली होती. लोकसभेची निवडणूक आपण जिंकल्यासारखीच आहे. या मतदारसंघात (संभाजीनगर) आपला पराभव झाला असला तरी इंडिया आघाडीने देशात 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप 240च्या पुढे जाणार नाही असं मी म्हणालो होतो, ते तिथेच अडकले.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या निकालाने दाखवून दिलं की, देशात माज आणि मस्ती चालत नाही. एकच आवाज चालतो, तो म्हणजे जनतेचा आवाज. लोकसभेच्या निकालाने दोन महिन्यातच फरक पडला आहे, मोदी आणि भाजपला आता एनडीए सरकार म्हणावं लागत आहे. याचं कारण जनतेचा आवाज संसदेत पोहचला आहे.
असं सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने दोन राज्यांची निवडणूक जाहीर केली पण महाराष्ट्राची निवडणूक ते घेत नाहीत. ते महाराष्ट्राला घाबरले आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो दिल्लीसमोर झुकणार नाही. गद्दारी कितीही झाली तरी गद्दारांची प्रगती 50 खोक्यांच्या पुढे होणार नाही.
कोणी 75व्या मजल्यावर घर घेतलंय.. कोणी डिफेंडर गाडी घेतली… कोणी वाईनची दुकानं काढली.. असं म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांचा हिशेब मांडला.