आदित्य ठाकरे : “महायुतीतील नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे नाव नाही”…

Photo of author

By Sandhya

आदित्य ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, दौरे सुरू आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरून आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर आवाहन करूनही शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मौनच बाळगले. निकालानंतर यावर चर्चा करण्याचा पवित्रा या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणाचा चेहरा आहे? हे सांगणे सर्वांत कठीण आहे. आता शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आता ठरणार नाही. त्यावर नाना पटोलेंनी री ओढली.

उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

महायुतीतील नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव नाही मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचे नाव नसेल, तर देवेंद्र फडणवीस यांचेही नाव नाही, शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

तसेच ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार केला, त्यांना जोडे मारणेही कमी आहे. भाजपा इतकी निर्लज्य कशी असू शकते, अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली.  दरम्यान, या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हे हेलिपॅड उभारण्यात आलं, त्याच्यावर पुतळ्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे.

स्टॅचू ऑफ लिबर्टी गेली १३८ वर्ष उभा आहे, तिथे उन, वारा, बर्फ सगळ पडते. पण आपल्या इथे मुख्यमंत्री वाऱ्यामुळे पुतळा पडला, असे सांगतात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. ते टीव्ही९शी बोलत होते. 

Leave a Comment