गद्दार आमदारांची किंमत त्यांना कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे, हा प्रश्न पडतो. याचे दु:ख देखील होते. पण, जनता त्यांना जागा दाखवेल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी लगावला.
प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या होत्या; पण शिवसेनेत आल्यावर चतुर्वेदी यांचे सौंदर्य पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला कोकणवासीयांनी विरोध केला. त्यामुळे सर्व कोकणातील जनतेला त्यांना देशद्रोही म्हणायचे असेल, अशा शब्दांत आ. ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलारांवर पलटवार केला आहे.
टोकाच्या विरोधामुळे नाणारला येऊ घातलेला प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला आहे, असा दावा करत शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.