लोकसभेच्या वायव्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीच्या प्रक्रियेत ‘फ्रॅाड’ झाला आहे. या मतदारसंघात ६५० अधिक मते मोजली गेली असल्याचा गंभीर आरोप करत याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज जाहीर केले.
निवडणूक यंत्रणेला हाताशी धरुन देशात अनेक मतदारसंघात अशी हेराफेरी केली नसती तर भाजप ४० जागादेखील जिंकू शकला नसता, असा आरोप पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या मतदारसंघात निवडणूक यंत्रणेने केलेला संशयास्पद व्यवहार आम्ही उघडकीस आणल्यानंतर आता देशातही अशा प्रकारच्या घटना उघडकीस येणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. पक्षाचे नेते अनिल परब यांनी या वेळी या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देताना त्यावर आक्षेप घेतला.
याप्रकरणी शिवसेना (ठाकरे) लोकप्रतिनिधी कायदा कलम ५१ अंतर्गत याचिका दाखल करणार आहे. ज्यात भ्रष्ट मार्गाचा अवलंब, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. मतमोजणीच्या १९ व्या फेरीनंतरच गडबड झाली आहे.
पोस्टल मतदान सुरुवातीला जाहीर करायला हवे होते, ते २६ व्या फेरीला केले गेले यावर ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप नोंदविला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक फेरीनंतर उमेदवाराला मिळालेली मते जाहीर करायची असतात. मात्र या मतदारसंघात १९ व्या फेरीनंतर मतमोजणी जाहीर करणे थांबवण्यात आले. १७ सी फॉर्ममध्ये मतपेटीत एकूण किती मतदान झाले, याची माहिती असते.
त्यावर सर्व मतदान प्रतिनिधींची सही असते. केंद्राध्यक्ष त्यावर सही करून आम्हाला फॉर्म देतात. मतमोजणीला गेल्यावर १७ सी नुसार मतपेटीत मते आहेत की नाही, याचा हिशोब जुळविला जातो. मग ती मतपेटी उघडली जाते.
यावेळी मागणी करूनदेखील अनेकांना हे फॉर्म दिलेच नाहीत. यामुळे ६५० पेक्षा अधिक मतांचा फरक आहे. त्यावर आम्ही आक्षेप नोंदवला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप विचारात न घेता एकतर्फी निकाल जाहीर केला, असे परब यांनी सांगितले.