महसूल विभागातील एजंटगिरी चर्चेत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटला भेटल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे कुणाचेही पाहुणे असले तरी एजंटगिरी सहन केली जाणार नाही,
अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमातच अधिकार्यांना खडे बोल सुनावले. विधानभवन येथे विभागीय आयुक्तालयातून राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.
पुणे विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, महसूल विभागातील अधिकार्यांची कामगिरी चर्चेत आहे. ही चर्चा चांगली किंवा वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.
मुख्यमंत्री कार्यालयापेक्षा भव्य इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाची बांधली. तसाच कारभार झाला पाहिजे. कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची अधिकार्यांनी काळजी घेतली पाहिजे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे राज्याच्या प्रशासनाचा नावलौकिक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. फक्त कणा मजबूत असून चालणार नाही, तर संपूर्ण शरीर मजबूत असावे लागते.
त्यासाठी कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकार्यांनी प्रशासनाची कामगिरी उत्तम होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय व्यवस्था अधिक गतिमान करण्याचे काम करताना परस्पर समन्वय ठेवावा, असेही पवार म्हणाले.