राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले आहे. त्या अंतर्गत आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आदिती तटकरे या महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकारपुढे आणले आहे. त्यानुसार यापुढे मुला-मुलींच्या नावापुढे आई व त्यानंतर वडिलांचे व शेवटी आडनाव लागेल.
महिला हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आईचे नाव यापुढे लागेल. अर्थमंत्री या नात्याने मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली गेली आहे.
पुरुषाच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास ६ टक्के तर महिलांच्या नावे होणार असल्यास ५ टक्के कर द्यावा लागेल. ५० लाखांचे घर महिलेच्या नावे घेतले. तर त्या कुटुंबाचे ५० हजार रुपये कर रुपाने वाचतील.
त्यामुळे पतीराज जर नवीन घर घेणार असतील, तर महिलांनीच ते घर माझ्या नावावर करा, कर कमी लागेल, अशी मागणी करायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.