महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान, अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा

Photo of author

By Sandhya


मुंबई :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page