“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्यात कोणतेही कोल्डवॉर अथवा नाराजी नाही. राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून प्रकल्पाचा आढावा घेतला आहे आणि तो मी घेऊ शकतो,’ असे सांगत “आमच्यात कोणताही वाद नाही,’ असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केला.
“आमच्यात कोणताही रूसवे-फुगवे नाहीत. कोणतीही माहिती न घेता चुकीच्या बातम्या पसरवत जात आहेत. तसेच आम्ही कितीही बैठका घेतल्या, तरी राज्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतात,’ असेही पवार म्हणाले.
अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि गती द्यायचं काम आम्ही करतो. आताही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतो आहे. देवेंद्र फडणवीस आमच्यासह आहेत. इतर सहकारीही आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते स्वत: घेतात. राधेश्याम मोपलवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी आहे.
मी या अर्थमंत्री म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. मोपलवारही बैठकीला होते. पण, काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं, अरे तुम्हाला काय त्रास होतो?’ असा प्रतिसवालही पवार यांनी यावेळी केला.