अजित पवार राष्ट्रवादीत खरंच अस्वस्थ?

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते, असा दावा शुक्रवारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. पवार नाराज आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार फुटण्याची चर्चा आहे,याबद्दल आपणाला काय वाटते, असा प्रश्न पत्रकारांनी भुसे यांना विचारला असता ते म्हणाले की, अजित पवार अस्वस्थ आहेत. हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत. मग काही पण होऊ शकते, असा दावा करायलाही ते विसरले नाहीत.

शिंदे गटाच्या 48 पैकी 40 जागा जिंकू असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुसे म्हणाले की, संजय राऊतांना स्वप्न पाहयाला बंदी नाही. त्यांनी अशी स्वप्ने बघत रहावीत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. गेल्या दोन दिवसांपूर्वीही अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यामुळे अनेक वावड्या उठल्या.

शेवटी अजित पवारांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगत माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. आदित्य यांचा बालिशपणा एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर भुसे म्हणाले की, हा सारा बालिशपणा आहे. त्यांनी हे तेव्हाच बोलायला हवे होते. ही राहुल गांधी यांची स्टाइल आहे. ते बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहेत. हा महाविकास आघाडीच्या संगतीचा परिणाम असल्याचा टोला त्यांनी हाणला. ते विकासावर बोलायला तयार नाहीत. कारण आम्ही तळागाळात जाऊन काम करतो आहोत. त्यांच्या पायाखालची त्यामुळे वाळू सरकल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page