अजित पवारांचं मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत मोठं विधान; मागण्या टाळतोय असं नाही, पण…

Photo of author

By Sandhya

अजित पवारांचं मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत मोठं विधान

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे.

यादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपत आल्याने काल आपली आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली.

येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे जाहीर केले.

तसेच या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असेही जरांगे स्पष्ट केले. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात मराठा आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. यादरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याच्या तोंडी टाकता येणार नाही, असं विधान त्यांनी बारामती येथे बोलताना केलं. आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही.

तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे.

पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही. आम्ही मराठा समाजाच्या मागण्या टाळतोय असं नाही.

पण आजपर्यंत ज्यांना आरक्षणाची मदत झाली त्या वर्गाला धक्का बसू न देता आरक्षण दिले पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे. वेळ मारुन नेण्याचा माझा स्वभाव नाही. जे करायचंय ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment