नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमा आगामी काळातही चालूच राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच देशातून नक्षलवादाचे उच्चाटन होईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
सुरक्षा दलांनी मंगळवारी छत्तीसगढमध्ये जोरदार स्ट्राइक केला. त्या राज्यातील कांकेर जिल्ह्यात झडलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
त्या पार्श्वभूमीवर, शहा यांनी निवेदन जारी करून नक्षली आणि दहशतवाद्यांविरोधात केंद्र सरकार अविरतपणे मोहिमा राबवत असल्याचे अधोरेखित केले.
छत्तीसगढमध्ये सुमारे ३ महिन्यांपूर्वी भाजपचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून जवळपास ८० नक्षलींचा खात्मा करण्यात आला. त्याशिवाय, १२५ नक्षलींना अटक झाली. तर, १५० जणांनी शरणागती पत्करली, असे त्यांनी नमूद केले.
मोदी सरकारने २०१४ या वर्षापासून नक्षलग्रस्त भागांत सुरक्षा दलांच्या छावण्या उभारण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे २०१९ पासून २५० छावण्या उभारल्या गेल्या. ते पाऊल सुरक्षाविषयक पोकळी संपुष्टात आणणारे ठरले, असेही शहा यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ येऊन ठेपले असतानाच छत्तीसगढमधील घडामोड घडली. त्या राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले गेले. त्यामुळे कांकेरमधील घटनेचे महत्व वाढले आहे.