केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबईत दाखल झाले. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दरम्यान, अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली.
यावेळी बोलताना त्यांनी मातृभाषेबाबत भाष्य केलं. “घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह काय म्हणाले?– माझ्या घरातही दोन माझे नातवडं आहेत. त्यांनी संस्कृत किंवा गुजराती भाषा शिकावी यासाठी मी त्यांना वेळ देतो. तसेच त्यांच्या शाळेत जाऊनही चर्चा करत असतो. त्यांच्या शाळेचे शिक्षक भाषा आणि भाषेचं व्याकरण व्यवस्थित शिकवतात की नाही हे देखील पाहत असतो.
मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की, कमीत कमी आपल्या घरात तरी आपली मातृभाषेतून बोला. त्यामुळे आपल्या मातृभाषेला आपली मुलं पुढे घेऊन जातील.
अन्यथा एक दिवस असा येईल की देशात आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धश्रम काढण्याची वेळ येईल. याचं कारण म्हणजे घरामध्ये नातू मातृभाषेत बोलला नाही तर नातवाचं आणि आजोबाचं नातं कसं जोडणार? त्यामुळे मातृभाषा बोलणं गरजेचं आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.