अमित शाह यांची मोठी घोषणा – मोदी सरकार लवकरच ओला-उबेरसारखी सरकारी टॅक्सी सेवा सुरू करणार

Photo of author

By Sandhya



गेल्या काही वर्षांमध्ये ओला-उबेरसारख्या खाजगी कॅब कंपन्यांनी देशात चांगलाच जम बसवला आहे. मात्र आता या कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. भारत सरकार लवकरच ओला उबेरसारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा केली आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सरकार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ओला-उबेरसारखा एक सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या माध्यमातून दुचाकी, रिक्षा आणि चारचाकींचीही नोंदणी करण्यात येईल. तसेच यामधून होणारा नफा हा कुठल्याही भांडवलदाराकडे नाही तर थेट ड्रायव्हरच्या खात्यांमध्ये जमा होईल.

दरम्यान, अमित शाह यांनी सभागृहात माहिती दिल्याप्रमाणे सरकारकडून प्रस्तावित असलेला हा नवा सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू झाला तर भारत हा खाजगी कॅब सेवेला सरकारचं पाठबळ असलेला सहकारी पर्याय सुरू करणारा जगातील पहिला देश बनेल. सद्यस्थितीत अशा प्रकारची सहकारी टॅक्सी सेवा जगातील अन्य कुठल्याही देशामध्ये उपलब्ध नाही. दरम्यान, सरकारने सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली, तर ओला-उबेरसारख्या खाजगी कॅब कंपन्यांसमोर मोठं अव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

यावेळी अमित शाह यांनी आणखीही एक महत्त्वाची माहिती सभागृहात दिली. त्यांनी सांगितले की, अल्पावधीतच आम्ही एक सहकारी विमा कंपनीही सुरू करणार आहोत. ही कंपनी देशभरातील सर्व सहकारी व्यवस्थांचा विमा उतरवेल, तसेच ही कंपनी स्थापन झाल्यानंतर काही काळातच ती खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page