महाराष्ट्रातील ऐंशी मतदारसंघात गद्दारी झाली. त्यात हडपसरचाही समावेश होता. मात्र, या संघर्षाच्या काळात प्रशांत जगताप ढाल बनून शरद पवार यांच्यासोबत राहिले. ही निवडणूक विचारांची, महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे. या लबाडी करणाऱ्यांना इमानदारीने भाजी-भाकरी खाणारा चांगला माणूस घरी बसवणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये आयोजित जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे,
माजी उपमहापौर नीलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, विजय देशमुख, दिलीप आबा तुपे, दिलीप शंकर तुपे, समीर तुपे, प्रवीण तुपे, कुमार तुपे, प्रशांत सुरसे, नितीन आरू, महेंद्र बनकर, गणेश फुलारे, प्रा. विद्या होडे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पस्थित होते. या वेळी अपक्ष उमेदवार सुशील मते यांनी प्रशांत जगताप यांना पाठिंबा दिला.
प्रशांत जगताप म्हणाले, “ही निवडणूक गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी आहे. या राज्यात ८० आमदार विकले गेले. पक्षाशी त्यांनी गद्दारी केली.हडपसरमध्येही पक्षाशी गद्दारी केली. जो आपल्या पक्षाचा, नेत्याचा होऊ शकत नाही, ते समाजाचे कधी होत नाहीत. त्यामुळे हडपसरचा स्वाभिमानी मतदार हा डाग पुसून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.’