अमोल कोल्हे : शरद पवार लढणार्‍यांविषयी बोलतात, गद्दारांविषयी नाही…

Photo of author

By Sandhya

अमोल कोल्हे

खा. शरद पवार जुन्नर तालुक्यात येऊन गेल्यानंतर काही जण बोलतात की, आमच्याविषयी काही बोलले नाहीत. पवारसाहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी कर्तृत्व लागतं, पात्रता लागते आणि बोललं जातं ते लढणार्‍यांविषयी बोललं जातं, गद्दारांविषयी नाही, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आ. अतुल बेनके यांचे नाव न घेता लगाविला.

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ नारायणगाव येथील जाहीर सांगता सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शरद लेंडे, अनंतराव चौगुले, किशोर दांगट, शरद चौधरी, माऊली खंडागळे, तुषार थोरात,

अशोक घोलप, प्रसन्न डोके, दिलीप बाम्हणे, मोहीत ढमाले, अंकुश आमले, दिलीप कोल्हे, योगेश पाटे, मंगेश काकडे, जयवंत घोडके, राजश्री बोरकर, समीर भगत, मोहन बांगर, कावा गागरे, संभाजी तांबे, भास्कर गाडगे, सुनील मेहेर, सईद पटेल, गुलामनबी शेख, सुमित्रा शेरकर, सुरेखा वेठेकर, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ आदी मान्यवरांसह ग्रामस्थ आणि मतदार उपस्थित होते.

खा. डॉ. कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणार्‍या युती सरकारच्या विरोधात वातावरण असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आ. बेनके यांना उद्देशून खा. कोल्हे म्हणाले, तुम्ही 2019 ला निवडून आल्यानंतर ठोस असे काय काम केलं आहे याचंसुद्धा उत्तर द्या. शिवसंस्कार सृष्टी, बिबट सफारी तिकडे घेऊन जाणारे कोण होते?

कृषीप्रधान तालुक्यामध्ये मिनी फूड पार्क आणत असताना मिनी फूड पार्कला कोणी विरोध केला? तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सीईओंना सांगून तिथं खोडा कोणी घातला? काही जणांनी पराभव समोर दिसायला लागल्यानंतर आता ते खालच्या थराला गेलेत, कमरेखालचे वार सुरू केलेत. राजकारण, समाजकारण करत असताना नैतिक अधिष्ठान टिकवणं गरजेचं होतं.

अनेकांचे संयम सुटले पण सत्यशील शेरकर याने आपला संयम ढळू दिला नाही, याचे कौतुक करत खा. डॉ. कोल्हे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने असे महत्त्वाचे कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत.

भाजप सरकारने उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याने या गद्दारांना घरी बसविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना विजयी करावे, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, खासदार अमोल कोल्हे यांचे कौतुक वाटते. शेतकरी कुटुंबातील या मुलाला निवडून तुम्ही दिले आणि भारतीय जनता पक्षाला जो अहंकार होता तो घालवण्याचे काम येथील मतदारांनी केले.

हे भ्रष्ट महायुतीचे सरकार आपल्याला घालवायचे आहे आणि शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, खर्गे, उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे सरकार निवडून आणयाचे आहे. सत्यशील शेरकर यांना लहानपणापासून पाहात आहे. त्यांना शेतकर्‍यांविषयाची तळमळ आणि जाण आहे. शेरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आमच्या बरोबर सभागृहामध्ये पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

उमेदवार सत्यशील शेरकर म्हणाले, जुन्नर तालुक्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाकडून भरीव निधी आणणार आहे, तसेच आयटी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी, हिंजवडी आणि मगरपट्टा या आयटी पार्कच्या धर्तीवर खासगी आणि सरकारी गुंतवणूक आणून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे.

शेतीमाल परदेशी पाठविण्यासाठी आणे पठारावर कार्गो हब उभारून तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार असल्याचे सांगितले. आदिवासी भागातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगून शरद पवार, उध्दव ठाकरे, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन सत्यशील शेरकर यांनी या वेळी केले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment