विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असताना राज्यातील बड्या पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सर्वोच्चपद हे जयंत पाटील यांना मिळणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी केलं आहे. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे मोठं पद जयंत पाटील यांच्याकडे जाणार म्हणजे कोणते पद असाही प्रश्न आता विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगलीत केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सांगलीतील शिराळा येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं (शरद पवार) सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांच्याकडे असेल, असं विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे. तसेच सांगलीतील महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन अमोल कोल्हे यांनी यावेळी केले.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अजून दोन बैठका बाकी आहेत. त्यामुळे मी आता काही म्हणत नाही. मात्र, तु्म्हाला माहिती आहे की, सांगली जिल्ह्यात त्या पदाच्या बाबतीत खूप मोठा बॅकलॉक झाला. पण मग तुमच्या सर्वांच्या खाद्यांवर जबाबदारी येते.
सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे, अशी भूमिका जर तुम्ही सर्वांनी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील सर्वोच्च पद जे असेल ते जयंत पाटील यांच्याकडेच असेल. कारण महाराष्ट्रात जेव्हा पक्षांची वाताहत होत होती. पक्षाचं काय होणार? असा प्रश्न पडला होता.
त्यावेळी जयंत पाटील यांनी मेहनत घेतली. मला अभिमान वाटतो की मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो जे नेतृत्व सुसंस्कृत आहे,” असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
“आता सध्या राज्यातील ८० मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या. ज्या आमदारांनी कोणत्या न कोणत्या प्रलोभनाला बळी पडून भूमिका बदलली, निष्ठा बदलली, आता त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की आपल्या आमदाराने गद्दारी केली मग आता बॅनर्सवर दमदार आमदार लिहायचं की गद्दार आमदार लिहायचं?” असं म्हणत अमोल कोल्हेंनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली.