बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या चकमकीत पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत.
ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, असा सवाल केला आहे.
अनिल देशमुख यांची पोस्ट “बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक, भाजपा पदाधिकारी देखील आहेत.
आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे”, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. बदलापूर प्रकरण नेमकं काय?
बदलापूर मधील नामांकित शाळेतील दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केला होता. वैद्यकीय तपासणीनंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
परंतु पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोप झाला. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी बदलापुरात संतप्त नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते.