अनिल देशमुख : राष्ट्रवादीच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप १२ डिसेंबरला

Photo of author

By Sandhya

अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार १२ डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी २ वाजता झिरोमाईल येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये आ. रोहित पवार यांच्या ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.

या सभेला उध्दव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, धान, संत्रा, तूर व इतर शेतमालास योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा,

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरूणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,

शाळा दत्तक योजना रद्द करा, समुह शाळा योजना रद्द करा या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. रोहित पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली आहे. सध्या ही यात्रा विदर्भात आहे.

झिरोमाईल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, खा. संजय राउत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पुथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण,

बाळासाहेब थोरात, शेकापाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाचे खासदार, आमदार व इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, अजितदादां सोबत गेलेल्या अनेकांचे शरद पवार यांच्याशी बोलणे सुरू असून, भविष्यात अनेकजण परत येतील असा दावा देशमुख यांनी केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page