
पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आता आणखी एका GBS निदान झालेल्या ५९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्ण खडकवासला येथून असून त्यांना जीबीएसची लक्षणे आढळून आल्याने १० फेब्रुवारी रोजी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर होऊन मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाला जीबीएसचे निदान झाले होते. जीबीएसबरोबरच हायपोटेन्सिव्ह शॉक आणि पल्मनरी एम्बॉलिझम या आजारामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केला.
हायपोटेन्सिव्ह शॉक आणि पल्मनरी एम्बॉलिझम नेमका काय आजार?
पल्मनरी एम्बॉलिझम या आजारामध्ये फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तर हायपोटेन्सिव्ह शॉक या आजारामध्ये कमी रक्तदाब (हायपोटेन्शन) आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत बिघाड होतो. यामुळे हृदयाच्याक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उपचारादरम्यान हायपोटेन्शनचा त्रास झाल्याने रुग्णाला कार्डिओप्लमनरी रेस्युसिटेशन (सीपीआर) देण्यात आला होता. परंतु हृदयाची क्रिया बंद पडून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अशक्तपणा, उठता बसताना त्रास होणे तसेच शरीराची कार्यक्षमता कमी झाल्याने रुग्णाला १० फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्लाझ्मा थेरपी देण्यात आली होती.
आतापर्यंत ८ रुग्णांचा GBS मुळे मृत्यू
पुणे जिल्ह्यात जीबीएसमुळे आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यातील चार रुग्णांचा मृत्यू जीबीएसमुळे तर अन्य चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तर बुधवारी नवीन एका संशयित रुग्णांची नोंद झाली. तर यापूर्वी आढळून आलेल्या पाच रुग्णांची नोंद बुधवारी करण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. पुण्यासह राज्यात आतापर्यंत २०३ संशयित रुग्णांची नोंद झाली असून यातील १७६ रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे. आतापर्यंत १०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात ५२ आणि व्हेंटीलेटरवर २० रुग्ण उपचार घेत आहेत.