महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय






Approval to name the Desi Cow Research and Training Center after ‘Ajitdada Pawar’
“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली” असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भोसलेनगर, पुणे येथे आज संपन्न झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिषद कार्यालयात झालेल्या या बैठकीत कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारासंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी परिषदेच्या सचिव तथा महासंचालक डॉ.वर्षा लढ्ढा-उंटवाल, उपाध्यक्ष तुषार पवार, कुलगुरु डॉ.संजय भावे, कुलगुरु डॉ.इंद्र मणी, कुलगुरु डॉ.विला खर्चे, कुलगुरु डॉ.शरद गडाख, अशासकीय सदस्य विनायक काशिद, कृषि शास्त्रज्ञ विनायक कातकडे, उपसचिव प्रतिभा पाटील, डॉ.मंगल कदम, डॉ.प्रशांत बोडके यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उर्वरित बळकटीकरणासाठी आवश्यक खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली. त्यानुसार या केंद्रासाठी गोशाळा, सिलो बंकर, बायोगॅस युनिट्स, कंपोस्टिंग व स्टोरेज युनिट्स, प्रयोगशाळा, शेतकरी वसतिगृह, प्रशिक्षण हॉल तसेच प्रशासकीय व निवासी इमारती आदी कामांसाठी टप्पा-२ अंतर्गत ५६ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपुर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”
“बैठकीत राज्यातील कृषी शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, संशोधन अधिक परिणामकारक करणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत जलद प्रसार करण्याबाबतही सखोल चर्चा झाली. तसेच कृषी विद्यापीठांच्या आकृतीबंधासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. राज्यातील कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत करून शेती क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून नवकल्पनांना चालना देणे हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे” कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.