नवी मुंबईत हत्येची धक्कादायक घटना | चिकन पार्टीत वाद, क्रिकेट बॅटने मित्राचा खून!

Photo of author

By Sandhya


मुंबई, नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गुन्हे घडत असून शुल्लक कारणावरून एका इसमाने त्याच्याच मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. चिकनची पार्टी करणं तरूणाच्या जीवावर बेतलं. पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला आहे. जयेश वाघे असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच रारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली. पाहता पहात ते भांडण वाढलं. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाताबुकयांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. एवढंच नव्हेतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले.

या मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्येच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलिस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधित तपास सुरू आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page