
पुणे: पुण्याच्या नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या भावाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ढकलून दिलं आहे. या घटनेत संबंधित भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. कौटुंबीक वादातून पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणातून भावाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.
अमर देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राजू भुरेलाल देशमुख असं आरोपी भावाचं नाव आहे. आरोपी राजू आणि अमर हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. दोघंही मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते पुण्यात आले होते. पुण्यातील धायरी परिसरातील एका सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात दोघंही काम करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजू आणि अमर यांच्यात वितुष्ट आलं होतं.
आरोपी राजू हा कौटुंबीक कारणातून अमरच्या पत्नीला शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशीही राजूने अशाच प्रकारे अमरच्या पत्नीला शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर अमर आणि राजूमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अमर राजूला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावत गेला. पण झटापटीत आरोपी राजूने अमरला थेट पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं.
यात अमरचा जागीच मृत्यू झाला. ही सगळी घटना धायरी परिसरातील कपील अपार्टमेंटमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबीक कारणातून झालेल्या वादानंतर एका भावाने दुसऱ्या भावाला अशाप्रकारे पाचव्या मजल्यावरून फेकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.