
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. प्रवेश वर्मा हे भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील असल्याची माहिती आहे. आपचे माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचादेखील पराभव झालाय. त्यांच्यापाठोपाठ आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या पराभवासह त्यांचं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. निवडणुकीत आपचा पराभव झाला तर आपण पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊ, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. भाजपने 45 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारल्याने आप आता सत्तेबाहेर जाणार असल्याचं स्पष्ट आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज मतमोजणी पार पडत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आप पक्षापेक्षा जास्त आघाडीवर दिसत आहे. भाजपने या निवडणुकीत तसं वातावरण देखील निर्माण केलं होतं. भाजपने या निवडणुकीत प्रचंड ताकद लावली होती. तसेच घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. परिणामी, आता दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. कारण भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळताना दिसतोय.
मुख्यमंत्री आतिशी मिश्रा अंतिम क्षणी विजयी, मनिष सिसोदियांचा पराभव
विशेष म्हणजे आम आदमी पक्षाच्या दिग्गजांना जनता आता घरी पाठवताना दिसतेय. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची माहिती आधी समोर आली. मनिष सिसोदिया यांचा 1200 मतांनी पराभव झाला. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मिश्रा या देखील सातत्याने पिछाडीवर जाताना दिसत होत्या. अखेर अटीतटीच्या लढतीत त्यांचा विजय झाला आहे.
प्रवेश वर्मा अमित शाह यांच्या भेटीला
अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर प्रवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. यावेळी अमित शाह यांनी प्रवेश वर्मा यांना भेटीसाठी बोलावून घेतलं आहे. प्रवेश वर्मा यांना पक्ष मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रवेश वर्मा आणि अमित शाह यांची ही भेट महत्त्वाची आहे.