भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाण्यासाठी अवघी पंढरपूर नगरी सजली आहे. पंढरपूर येथील मुख्य मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे.
मनामध्ये विठुरायाच्या दर्शनाची आस आणि मुखी पांडुरंगाचे नाव, शेकडो मैलाची पायपीट करत आषाढी सोहळ्यासाठी निघालेला दिंड्या बुधवारी पंढरपूर मुक्कामी दाखल झाल्या आहेत. आळंदी इथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, देहू इथून निघालेली जगतगुरु तुकोबारायांची पालखी, सासवड इथून निघालेली संत सोपान देवांची पालखी अशा सर्वच महत्त्वाच्या पालख्या बुधवारी तळावर विसावल्या.
सर्व संतांना निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेवराय पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर विसावा घेऊन थांबणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेली मुक्ताबाई पालखी देखील विसाव्याकडे जाणार आहे.
पैठण येथून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आणि त्र्यंबकेश्वर मधून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी परंपरेनुसार विसाव्याजवळ दाखल झाली आहे.
अनेक भाविक ज्यांना पालखीत किंवा दिंडीत सहभागी होणे शक्य नसते, ते मिळेल त्या वाहनाने पंढरपूरच्या दिशेने पंढरपूर शहरांमध्ये दाखल होत आहेत. यात्रेकरूंच्या संख्येत घट यंदा आषाढी एकादशी ही विक्रमी होणार या अंदाजाने शासन, प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.
मात्र आज (28 जून) आषाढ शुद्ध दशमीला पत्राशेडच्या बाहेर रांग आलेली नाही. त्यामुळे पुढे जवळपास तीन किलोमीटर बनवलेली रांग ओस पडल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ दिल्यानेच भाविकांनी आषाढी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी दशमीला दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे रांजणी रस्त्याला गेलेली असते. यावेळी मात्र अजूनही दुपारपर्यंत गोपाळपूर येथील पत्राशेडच्या बाहेर रिद्धीसिद्धी मंदिरापर्यंतच रांग पोहोचली आहे. त्यामुळे यंदा आषाढी यात्रेकरुंच्या संख्येत किमान 20 ते 30 टक्क्यांची घट झाल्याचे चिंताजनक चित्र आहे.
मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील जवळपास अर्धा डझन मंत्री बुधवारी पंढरपुरात दाखल झाले. रात्री उशिरा विठुरायाच्या महापूजासाठी ते मंदिरात दाखल होतील आणि सकाळपर्यंत विठुरायाची महापूजा चालणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पंढरपूर हजर झाले आहेत.