आमदार बच्चू कडू यांच्या विधानामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. नागपुरात एका माध्यमाशी बोलत असताना बच्चू कडू यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपला महागात पडेल असा इशारा दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी ठेवलेल्या स्नेहभोजनाचे निमंत्रण आपल्याला नाही. आपण कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे कदाचित हे निमंत्रण आले नसेल.
पण दर्जा आणि मंत्रिपद यात बरेच अंतर आहे. मात्र आता छातीवर तलवार ठेवली तरी आपण मंत्री होणार नाही असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केले तर भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील असे खळबजनक विधान बच्चू कडू यांनी केले.
बच्चू कडू यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि सहकाऱ्यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर गेल्या काही दिवसात महायुतीत सर्व काही ऑलवेल नसण्याचे बोलले जाते.
आमदार बच्चू कडू यांनी देखील मोर्चा काढण्यासोबतच वेळोवेळी वेगळी भूमिका गेल्या काही दिवसात घेण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या नाराजीला, या विधानाला राजकीय महत्त्व आले आहे.
काँग्रेसच्या गटातूनही बच्चू कडू भविष्यात मविआसोबत येतील असा विश्वास मध्यंतरी व्यक्त करण्यात आला होता. आमदार बच्चू कडू यांनी आता आपल्याला मंत्रिपदात रस नाही संधी मिळालीच तर दुसऱ्या सहकाऱ्याला ती दिली जाईल असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रिस्क घेऊन शिवसेना सोडली.
त्यांच्या या धाडसामुळेच भाजपचे सरकार सत्तेत आले, असे असताना आता त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करत इतरांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे निश्चितच परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.