पोट दुखत असल्याने तपासण्यासाठी आई-वडिलांसमवेत दवाखान्यात आलेली मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता, तिच्यावर सख्ख्या भावानेच अत्याचार केल्याचे समोर आले.
बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना बालिकाश्रम रोड परिसरात घडली. तोफखाना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मोलमजुरीच्या कामावर जाणारे आई-वडील घरी नसताना अल्पवयीन बहिणीचे सुमारे 21 वर्षांच्या भावानेच लैंगिक शोषण केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित मुलगी 17 वर्षांची असून, तिच्या पोटात दुखत असल्याने तपासण्यासाठी आई-वडील तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मुलीची चौकशी केली तेव्हा घरी कोणी नसताना सख्ख्या भावानेच अत्याचार केल्याचे तिने सांगितले. आरोपी भावावर बालकांचे लैंगिक शोषण (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.