पुणे : सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ठिकठिकाणी मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
शिंदे गटाकडून बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे. (Market Committee Election)
पुणे आणि जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने मतदान थांबवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत आज मतदान पार पडत आहे. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत एका अपक्ष उमेदवाराने थेट मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला.
बोगस मतदान होत असल्याचं सांगून सुद्धा अधिकारी आमचं ऐकत नाही, अधिकारी सरकारच्या दबावाखाली आहे, असा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला. दरम्यान, यावेळी त्यांची सरकारी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं, पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
जळगाव पाठोपाठ पुण्यातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा दावा करत मतदारांनी गोंधळ घातला. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर बऱ्याच मतदारांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणाऱ्या मतदारांना मतदान बाहेर काढलं.