शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणुकीनंतर फुटणार असून, त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मशाल व तुतारीसह संपुष्टात येतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पाचव्या टप्प्यातील मतदानात २०१९ पेक्षा अधिक जागांनी आम्ही जिंकू, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.
त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी राज्यामध्ये तयार केलेला महाविकास आघाडीचा फुगा ४ जूननंतर फुटणार असून, महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे होतील. त्याचबरोबर राज्यातील दोन्ही पक्ष संपुष्टात येतील. मशाल व तुतारी हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर राज्यात दिसणार नाहीत.
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, की राऊत यांना पराभवाचे लक्षण दिसत आहे. त्यामुळे त्यांनी केलेली वक्तव्य हे साधारण आहे ते बोलतच राहणार. जसजसा पराभव जवळ येईल त्याप्रमाणे ईव्हीएम खराब आहे, मशिनच खराब झाली, मशिनमध्ये दोष आहे, असे आरोप होतील.
घोटाळ्याचे आरोप फेटाळले खासदार राऊत यांनी नाशिक महापालिकेत आठशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप केला. येत्या काही दिवसांत हा घोटाळा आपण बाहेर काढू, असा इशारा दिला आहे.
यावर बावनकुळे यांनी राऊत यांचे आरोप फेटाळताना त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. राऊत हे सध्या काहीही बरगळत सुटले आहे. त्यांच्या प्रश्नांना किंवा आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही.