हिंगोलीतील भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात आज (दि.१) दुपारी ३ च्या सुमारास गोळीबार झाला. यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या.
यातील एक गोळी त्यांच्या पाठीत लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत हल्लोखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. रूग्णालयासमोर चव्हाण समर्थकांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी धाव घेतली.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आज आले होते. ते ३ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठीत घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.