
मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी चौकात भरधाव वेगातील आयशर टेम्पो पाच वाहनांना धडक देत दुभाजकावर आदळला. ब्रेक निकामी झाल्यामुळे घडलेल्या या अपघातात पाच जण जखमी झाले.
यात वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वेळी मंतरवाडी चौकातील वाहतूक पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आयशर टेम्पो प्रचंड वेगात होता.
उरुळी देवाची कचरा डेपोच्या उतारावरून मंतरवाडी चौकाकडे जात असताना टेम्पोने कारला धडक देत पुढे जाऊन तो दुभाजकावर आदळला. या भीषण अपघातात टेम्पोची पाठीमागील चाके मागे दुभाजकावर अडकली, तर टेम्पोचा पुढील भाग रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली.
बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. क्रेनला पाचारण करून आयशर टेम्पो बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.