राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान कदापिही सहन केला जाणार नाही. संभाजी भिडेच नव्हे; तर कुणीही असे वक्तव्य करू नये, महात्मा गांधी यांच्या अवमानाने कोट्यवधी लोकांमध्ये उठलेला संताप स्वाभाविक आहे.
यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे, ती राज्य सरकार करेल, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
महात्मा गांधी असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, कुणा महापुरुषांविरुद्ध बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच संभाजी भिडे यांचा भाजपशी संबंध नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, भिडे स्वतःची संघटना चालवतात. त्यांच्या वक्तव्यावरून जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही. भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ शब्दांत ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्यावेळी हे मिंधे गप्प राहतात.
भिडेंच्या वक्तव्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
या महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे पूर्णपणे अनुचित आहे. अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी करू नये. देशाचे नागरिक हा प्रकार कधीच सहन करणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.