विटा- महाबळेश्वर या राज्य मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही गव्हाण (ता. तासगाव) येथील काशीद कुटुंबातील आहेत. हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला. विटा पोलीस ठाण्यात अपघाताबात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी विट्याकडून ट्रॅव्हल्स (क्र. ए आर ०१ जे८४५२) ही गाडी विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी सातारा कडून येणारी फोर्ड फिएस्टा ही कार विटा च्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. हे सर्वजण साधारणपणे ५५ वर्षाच्या पुढच्या वयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात गव्हाण येथील काशीद कुटुंबीयातील चंद्रकांत काशीद, पत्नी सुनीता काशीद, मेहुणा अशोक आणि चालक यांचा अपघात आणि जागीच मृत्यू झाला. सदानंद काशीद हे एअर बॅग उघडल्यामुळे सुखरूप बचावले.
हे पाचही जण कार गाडीतून तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी मुंबईहून आपल्या गावाकडे येत होते. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर गाडीत असलेली एअर बॅग उघडलयाने बचावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.